नियती नावाची मावशी
उजव्या कुशीवरून डाव्या
कुशीवर एकदाच वळली
फक्त...
माझ्या एक एक तासाची
किंमत आहे असं उर्मट
चेहऱ्याने सांगणारे,
पुढच्या महिन्यात फोन करून
पाहा. हा महिना तर अगदी
ओव्हर पॅक आहे म्हणणारे,
पुढच्या दोन महिन्यात सहा
देशांत फिरणार आहे असं
मिरवणारे,
तुला बघुन घेतो मी, तुझ्या
गावात येऊन घरात घुसतो
असा दम भरणारे,
मी फोन उचलत नाही हो.
सतत मिटिंग असतात
ऑफिस मध्ये आमच्या
असा दावा करणारे,
माझ्या एका हाकेवर दहा
हजार लोक जमा होतील
असं गरजणारे,
दर काही दिवसांनी
ऑफिस ची टूर आहे
सांगून बाहेरख्याली
करून फसवणारे,
सगळे थांबले..
शांत..
एका रांगेत..
तोंड झाकून..
अंतर राखून..
नियती नावाची मावशी
उजव्या कुशीवरून डाव्या
कुशीवर एकदाच वळली फक्त..
*-सलील कुलकर्णी.*
No comments:
Post a Comment