"मेनोपॉज..सिर्फ नामही काफी है..!!"
"डॉक्टर हल्ली खूप कंटाळा येतो सगळ्या गोष्टींचा..सारखी चिडचिड होते..काही करावसंच वाटत नाही"
"डॉक्टर सगळं अंग दुखतं सतत..तोंडाला चव नाही..रात्री झोप लागत नाही"
"डॉक्टर कंबरदुखीने त्रस्त झालीये गेले काही महिने..खरंतर सगळेच सांधे दुखतायेत..सारखा 'विकनेसपणा' वाटतो"
"डॉक्टर गेले सहा महिने दर १५ दिवसांनी पाळी येतेय आणि खूप जास्त ब्लीडींग होतंय"
"डॉक्टर सध्या माझं इतकं प्रचंड वजन वाढतंय..कितीही व्यायाम ,डाएट केलं तरी उपयोग च होत नाही..ब्रेस्ट पण खूप दुखतात"
या सगळ्या पेशंट मध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे हा त्रास मेनोपॉज मुळे आहे याबद्दल ह्या पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांची पूर्ण खात्री पटलेली असते.
आपल्या समाजात सध्या चाळीशीच्या वरच्या कोणत्याही आरोग्य समस्येचे खापर मेनोपॉज वर फोडण्याची फॅशन च आली आहे.मग समस्या कोणतीही असो..हे अतिशय चुकीचे आणि घातक ठरू शकते.खरंतर स्त्री चे मेनोपॉज चे वय हे साधारणपणे ४८-४९ आहे,कधी कधी ५०-५१ पर्यंतही पाळी चालू राहू शकते .पण ५० नंतर पाळी चालू राहिल्यास अतिशय नियमितपणे स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करून घ्यायलाच हवी.
चाळिशीनंतर स्त्रियांना आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात .यामागे आत्तापर्यंत शरीराकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष हा महत्त्वाचा भाग असतो.योग्यआहार आणि व्यायाम याचा कधीच विचार न केल्यामुळे वाढलेले वजन,गरोदरपणात आणि प्रसुतीनंतर रक्तवाढीच्या आणि कॅलशियम च्या गोळ्या नियमित न घेतल्यामुळे शरीरात आलेला कमकुवतपणा,घरच्यांनी योग्य तो आधार न दिल्यामुळे आलेले मानसिक नैराश्य या सगळ्या गोष्टी चाळिशीनंतर स्त्रीच्या अनारोग्याला कारणीभूत असतात.
मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जनन संस्थेचे काम हळू हळू संथ होत जाते आणि सरतेशेवटी पूर्ण थांबते.हा बदल अतिशय सावकाश आणि स्थिर गतीने होतो.त्यामुळे याचे शरीरावर कोणतेही अतितीव्र परिणाम शक्यतो दिसत नाहीत.
नॉर्मल मेनोपॉज मध्ये पाळी उशिरा उशिरा येत जाते आणि ब्लीडींग कमी कमी होत जाते.हा आणि हाच पॅटर्न मेनोपॉज मध्ये नॉर्मल समजला जातो.आपल्या समाजात दर १५ दिवसांनी पाळी येऊन प्रचंड रक्तस्त्राव होणाऱ्या स्त्रीला हा मेनोपॉज चा त्रास आहे..होणारच असं तिच्या आजूबाजूचे निकटवर्तीय उर्फ स्वघोषित वैद्यकीय तज्ञ(!!) पटवून देतात आणि मग तीसुद्धा निमूटपणे हे दुखणं अंगावर काढत राहते.
साधारणपणे मेनोपॉज मध्ये काय होणं अपेक्षित आहे हे बघूया.
१)पाळी उशिरा उशिरा येऊ लागणे,तरीही रक्तस्राव नॉर्मलच असणे.
२)थोडेफार मूड्स बदलणे,कधीतरी निराश वाटणे.
३)'hot flashes' म्हणजे अचानक शरीराच्या वरच्या भागाला खूप घाम येतो आणि खूप गरम वाटते.हा प्रकार पाळी पूर्णपणे थांबल्यावर १-२ वर्षात होणं अपेक्षित आहे.पण काही स्त्रियांना आधी जाणवू शकतो.
४)योनीमार्गामध्ये कोरडेपणा जाणवणे तसेच लैंगिक इच्छा कमी होणे.
५)योनीमार्गाच्या अतिकोरडेपणामुळे कधी कधी त्या भागात खाज सुटणे किंवा वारंवार लघवीचा संसर्ग होणे.
६)शरीरातील हॉर्मोन चे प्रमाण कमी झाल्यामुळे कॅल शियम ची कमतरता जाणवायला लागते आणि स्नायू आणि हाडेदुखीची सुरवात होऊ शकते.
७)काही स्त्रियांना झोप न येणे,केस गळणे,डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा अश्या समस्या येऊ शकतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या समस्यांवर अतिशय प्रभावी असे उपाय उपलब्ध आहेत.कारण नसताना सहन करत राहायची काहीच गरज नाही.फक्त वैद्यकीय सल्ला वेळेवर घेऊन त्याचे तंतोतंत पालन करायला हवे.
आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा..
मेनोपॉज चं वय साधारणपणे ४८-४९ वर्षे आहे.आयुष्याच्या या टप्प्यावर इतरही अनेक व्याधी शरीरात प्रवेश करतात.मधुमेह,रक्तदाब ,थायरॉईड यासारख्या समस्या चाळिशीनंतर सुरू होतात.यासाठी च्या तपासण्या नियमितपणे करणे गरजेचे असते.या तपासण्या बहुतेक स्त्रिया अजिबातच करत नाहीत.आणि मग होणाऱ्या त्रासाला मेनोपॉज चे नाव देऊन मोकळ्या होतात.
पाळीचे त्रास,सतत वाढणारे वजन,अंगावर सूज,त्वचेचा कोरडेपणा,केस गळणे या सर्व गोष्टी थायरॉईड च्या समस्येमध्ये दिसू शकतात.
योनीमार्गात सतत खाज सुटणे,लघवीचा जंतुसंसर्ग,अशक्तपणा,शरीराचा विशेष करून पायाचा दाह होणे,वजन वाढणे ही लक्षणे मधुमेहाचीही असू शकतात.
छातीत धडधडणे,एकदम घाम येणे,डोकेदुखी,मुंग्या येणे,मूड्स चे बदल हे वाढलेल्या रक्तदाबामुळेही किंवा क्वचित हृदयरोगाचे लक्षण असू शकते.
संधीवाताची सुरुवात सुद्धा साधारण चाळिशीनंतर होऊ शकते.
त्यामुळे स्वतःच हा त्रास मेनोपॉज चा आहे असे निदान न करता डॉक्टरांचा सल्ला वेळेत घ्यावा हे उत्तम!!
मेनोपॉज चा त्रास भारतीय बायकांना कमी होतो अशी वैद्यकीय क्षेत्रात आत्तापर्यंत समजूत होती .एकत्र कुटुंब पध्दतीमुळे आपल्या स्त्रियांना कौटुंबिक आधार उत्तम असायचा,मानसिक एकटेपणा येत नसे.बदलत्या काळानुसार कुटूंबाचा आकार छोटा होत गेल्याने स्त्री हल्ली मेनोपॉज च्या वयात खूप एकटी पडू लागली आहे .घरट्याबाहेर पडलेली मुलं आणि कामात मग्न नवरा अशी परिस्थिती असल्याने या स्त्रिया फार लौकर नैराश्याने घेरल्या जातात आणि मग निराश मन वेगवेगळ्या व्याधींना शरीरात लगेच आमंत्रण देतं.
तर असं आहे हे मेनोपॉज पुराण..
या सगळ्या मेनोपॉज प्रकरणाला योग्य रीतीने कसं हाताळायचं ते आपण पुढच्या लेखात बघूया!
डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोगतज्ञ व वंध्यत्वतज्ञ
कोथरूड
पुणे
No comments:
Post a Comment