Sunday, May 17, 2020

लंचबाँक्स

*लंचबाँक्स*

"ये रे उदय जेवायला" सात आठ जणांसोबत जेवायला बसलेल्या श्रीकांतनं त्याला हाक मारली.
" सुरु करा तुम्ही मला भुक नाहीये" उदय उत्तरला खरा पण त्याला सडकून भुक लागली होती.त्यातून उघडून ठेवलेल्या डब्यांतून येणारा भाज्यांचा खुमासदार वास त्याला वेडं करत होता.तिथून तो तडक निघाला आणि आँफिसबाहेर आला.समोर चहाची टपरी सुरु होती.तिथं जाऊन त्यानं एक फुल चहा मारला.वर बिस्कीटं खाल्ली.खवळलेला जीव थोडा शांत झाला.पण आता आत गेलो तर परत जीव कासावीस होणार हे त्याला माहीत होतं म्हणून टपरीवरचं एकमेव व्रुत्तपत्र दोन तीन वेळा वाचून त्यानं टाईमपास केला अ्न दोनच्या सुमारास तो आँफिसमध्ये परतला.

  गेल्या चार वर्षांपासून हे असंच सुरु होतं.लग्नाअगोदरची तीन वर्षं आणि लग्नानंतरच एक वर्ष त्यानं जेवणाच्या डब्याशिवायच घालवली होती.नाही म्हणायला लग्नानंतर महिनाभर आरतीनं त्याला डबा दिला होता.पण तिचे होणारे हाल आणि होणारी धावपळ पाहून त्यानंच तिला डबा करायला नाही सागितलं होतं.आरती स्वतःही नोकरी करत होती आणि तिलाही उदयसारखं लवकरच निघावं लागायचं.तिच्या कंपनीच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या सुग्रास जेवणामुळे तिला डब्याची गरज भासायची नाही .मात्र उदयच्या आँफिसमध्ये तशी कसलीच व्यवस्था नसल्याने त्याच्यासाठी डबा करायला तिला पहाटे चार वाजताच उठावं लागायचं.त्यामुळे त्याचा डबा करुन,तिची स्वतःची तयारी करुन कंपनीत जाण्यासाठी तिला अगदी तारेवरची कसरत करावी लागत होती.ते पाहूनच उदयनं तिला डबा करायला मनाई केली खरी पण ते सांगतांना त्याला खुप दुःख झालं होतं.

डब्याच्या बाबतीत उदय अगदी लहानपणापासून असाच कमनशीबी होता.तो तिसरीत असतांना त्याची आई वारली आणि त्याचा डबा कायमचा बंद झाला.व्यापारी असलेल्या त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं.त्याच्या सावत्र आईने त्याचा छळ नाही केला पण त्याला प्रेमही नाही लावलं.उदयची शाळा सकाळी सातची असायची आणि ही बया नऊ वाजता उठायची.त्याला शाळेत सोडणारे गडीमाणसं त्याच्या दप्तरात बिस्कीटाचा पुडा,चिवड्याचं नाहीतर वेफर्सचं पाकिट असं काहीबाही टाकून द्यायचे.मधल्या सुटीत बाकीची मुलं डबे उघडून बसायची तेव्हा उदय असुयेनं त्यांच्याकडे बघायचा.चिवडा,बिस्किटांनी त्याचं मन आणि पोट दोन्ही भरायचं नाही.भाजीपोळी आणली नाही म्हणून टिचरचा मार तो खायचा ते वेगळंच.
दहावी झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला दुर काँलेजला पाठवलं.तिथं मेसच्या जळक्या पोळ्या आणि पाणीदार भाज्या खाऊन त्यानं दिवस काढले.चुकूनही त्यानं कशाविषयी त्यानं तक्रार केली नाही.काँलेज झाल्यावर त्याला शहरात चांगली नोकरी लागली पण इथंही डब्याची काहीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे सकाळी एखाद्या हाँटेलवर केलेला नाश्ता आणि संध्याकाळी मेसवर केलेलं बेचव जेवण असंच त्याचं रुटीन राहीलं.

उदय खऱ्या अर्थाने उपाशी होता.प्रेमाने करुन दीलेला दुपारच्या जेवणाचा डबा हे त्याचं स्वप्न होतं.लग्नानंतर तरी हे दिवस पालटतील आणि आँफिसमध्ये बसून बायकोच्या हातचा वरण,भात,भाजी,पोळीचा डबा सुखाने खाता येईल या सर्व आशेने तो लग्नासाठी आतुर झाला होता.लग्न ठरलं पण देखण्या आरतीने आहे त्या कंपनीतली लठ्ठ पगाराची नोकरी मी सोडणार नाही अशी अट टाकली.सर्वांनी ती खुषीने पण उदयनं नाराजीने मान्य केली.

लग्नानंतर एक महीन्यातच डबा बंद झाला.त्याच्या सहकाऱ्यांना याची त्यानं बरीच कारणं दिली तरी त्यांना ती पटली नाही.त्यामुळे आपुलकीची जागा आता औपचारिकतेने घेतली होती.लंच पिरीएड मध्ये सगळे सहकारी डबे उघडून बसले की औपचारीकतेने बोलवायचे.किती दिवस दुसऱ्यांच्या डब्यातलं खाणार म्हणून तोही तितक्याच औपचारिकतेने त्यांना भुक नाही असं सांगायचा.या काळात आधीच अबोल असलेला उदय अजूनच अबोल होत गेला.आपल्या अस्वस्थतेबद्दल घरीही तो चकार शब्द काढायचा नाही.आरतीची असहाय्यता त्यालाही कळत होती.

         एके दिवशी आँफिसला जाण्यासाठी तो उठला.पाहतो तर आरती किचनमध्ये कांदा चिरत होती.
"हे काय?आज काही विशेष?"त्यानं विचारलं
"विशेष काय असणार आहे?तुमच्यासाठी डबा बनवतेय"ती कांदा चिरतांना डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाली.
"काय?आणि आज तुला कंपनीत नाही जायचं?"त्यानं आश्चर्याने विचारलं.
"मी उशीरा जाणार आहे थोडं,काही सेटलमेंट करायच्या आहेत"
"कसल्या सेटलमेंट?"
"सांगते. संध्याकाळी तुम्ही आँफिसमधून परतल्यावर"
" ओके.आज मजा येईल आँफिसमध्ये"तो आनंदाने म्हणाला.

आँफिसमध्ये आल्याआल्या त्यानं डबा आणल्याची अनाउन्समेंट करुन टाकली.
दुपारी सर्वांसोबत जेवतांना तो खुप खुष होता.
"अरे पण डबा आजच्या दिवसासाठीच आहे की रोजच आणणार आहेस?"कोणीतरी विचारलं तसा तो भानावर आला.
"बघुया"असं म्हणून त्यानं उत्तर द्यायचं टाळलं.त्याला स्वतः ला तरी कुठे माहीत होतं त्याचं उत्तर!

संध्याकाळी तो घरी आला तेव्हा आरती घरीच होती.चहा झाल्यावर त्याच्या समोर बसत म्हणाली.
"उद्यापासून तुम्हाला रोज डबा मिळेल.मी नोकरी सोडलीय"
"काय?असा अचानक निर्णय कसा घेतलास?
" अचानक नाही.आठवतंय १५-२० दिवसांपुर्वी तुमचा बालमित्र घरी आला होता.त्याने मला तुमची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ती ऐकुन खुप रडले मी.तेव्हाच मी निर्णय घेतला होता.मागच्या आठवड्यातच मी राजीनामा दिला.आज सगळी सेटलमेंट करुन आले"
तो धक्का बसल्यागत तिच्याकडे बघत होता.
" अगं पण एक शब्दाने तर मला विचारायचं होतं"
"तुम्ही नाहीच म्हंटला असता आणि मग मलाही मोह झाला असता.पण काळजी करु नका.मी आता घरबसल्या रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करणार आहे.तुम्हाला माहीत आहेच की माझं पुर्ण कुटुंब व्यवसायातच आहे त्यामुळे मी नक्कीच यशस्वी होईन."
त्याचा अजून स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता.
"पण निव्वळ माझ्या डब्यासाठी तू इतक्या चांगल्या पगाराची नोकरी....."
"डब्यासाठी नाही तर तुमच्या आनंदासाठी,समाधानासाठी सोडली असं म्हणा.पुढे आपल्याला मुलं होतील.त्यांचीही तुमच्यासारखी डब्याअभावी  झालेली अवस्था मला बघवणार नाही."
"ग्रेट आहेस तू आरती"तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला.
" नाही उदय.मुलं आणि कुटूंबासाठी आपल्या भारतातील असंख्य बायका करीयर आणि पैशावर पाणी सोडतात.ज्या सोडत नाहीत त्या ऐतखाऊ नवरा आणि कजाग सासुचा त्रास सहन करत तारेवरची कसरत करत असतात.त्यामानाने मी खुप नशीबवान आहे.मला सासू नाही आणि नवरा खुप समजदार मिळालाय"
तिच्या मनाचा मोठेपणा पाहून त्याचे डोळे पाणावले.

*©दीपक तांबोळी*
       9503011250
(ही कथा माझ्या "कथा माणुसकीच्या " या पुस्तकातील आहे.क्रुपया नावासहितच शेअर करावी)

No comments:

Post a Comment

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...