ऑफिसमध्ये आल्यावर क्युबिकल मध्ये न जाता आधी वॉशरूम मध्ये जाऊन चेहरा वगैरे धुणं
मग बॅग क्युबिकल मध्ये ठेवत टीममेट्स बरोबर ख्या ख्या करणं,
ह्यानंतर लगेच चहा प्यायला जाणं आणि १५-२० मिनिटांनी येणं
आल्यावर "पाणी भरायचंच राहिलं" या नावाखाली ती dmart मधली बाटली घेऊन परत pantry मध्ये जाणं आणि पाणी भरून आणणं
तेवढ्यात अजून कोणी आलं तर त्याच्याबरोबर परत एकदा ""मी घेतलाय चहा पण तुझ्याबरोबर येतो" या नावाखाली कॅन्टीनमध्ये जाणं
हे सगळं पार पाडलं कि मग नंतर कामाला सुरुवात करणं .. थोडंफार काम झालं कि मग लंचची वेळ सुरु होते..
मग आपापलं टप्परवेअर घेऊन उठायचं आणि सगळ्यांचा थवा घेऊन कॅन्टीन कडे निघणं
त्यात एक दोन जबाबदारी असलेली लोकं सीटला चिकटून असतात त्यांना डिस्टर्ब करून उठवून नेणं
मग कॅन्टीन मध्ये गेलं कि सगळ्यांना एकत्रच बसायचं असल्यामुळे त्या सीट्स मिळेपर्यंत सगळं बिऱ्हाड घेऊन इकडे तिकडे फिरत राहणं
आणि काही सीट्स रिकाम्या दिसल्या कि is it free, we are four, six वगैरे काकुळतीला येऊन विचारणं
काही जण डबा घेऊन येत नाहीत त्यामुळे ऑर्डर द्यायला जातात, काहीजणांना डबा आणला तरी अजून काहीतरी खायला हवं असतं त्यामुळे तेही ऑर्डर करतात, काही जण डब्यातलं जेवण गरम करायला रांगेत पळतात... कॅन्टीनचा मेन्यू आयुष्यभर तोच असला तरी आज काय खायचं यावर बराच वेळ घालवतात..
एवढं सगळं होऊन एकदाचं जेवण झालं कि मग काही रसिक दर्दी "छाछ" प्यायला दुसऱ्या काउंटरकडे वळतात, जसं काय घराकडे यांना रोज असलं ताक मिळतं.. मराठी लोकं अगदी लाडाने छाछ/बटरमिल्क द्या म्हणतात, एक ताक द्या असं म्हणणं फॉर सम अननोन रिझन निषिद्ध आहे बहुतेक...
हे सगळं झालं कि मग जेवलेलं जिरावं म्हणून राउंड मारायला निघतात, ऊन लागू नये म्हणून ऑफिसमध्ये जो पार्किंग लॉट असतो त्यात डुलत डुलत फेऱ्या मारत राहणं
यांचा असा समज असतो कि तो अख्खा पार्किंग लॉट आपल्याला जेवल्यावर फेऱ्या मारायला दिलाय म्हणून लोकांनी शक्यतो वाहनं चालवून डिस्टर्ब करू नये अशी त्यांची अपेक्षा असते त्यामुळे कुठली गाडी आली कि जणूकाही फुटपाथवर गाडी आलीये इतक्या त्रासिकपणे ते वाहनचालकाकडे बघतात.
नंतर फेऱ्या मारून झाल्या कि परत काम सुरु होतं... एक दोन कॉल्स असतात त्यात तेच टॉपिक तीच फालतुगिरी तीच कन्सर्स तीच चॅलेंजेस परत एकदा रिपीट होणं
नंतर वेळ येते दुपारच्या चहाची... मग त्यासाठी परत एकदा एकूणएक जथ्था कॅन्टीनच्या दिशेने वळतो आणि चहा/ग्रीन टी/कोल्ड कॉफी/सँडविच/ पोहे/भेळ/ऑम्लेट वगैरे गोष्टींची खरेदी करणं
काही कलाकार बिडीकाडीसाठी कॅम्पसच्या बाहेर पडतात ते बराच काळ येतच नाहीत.
परत अध्येमध्ये चल पाणी भरून येऊन म्हणून काही जण जातात ...
काहीजण मधल्या कॉरिडॉरमध्ये फोनवर बराच वेळ बोलत असतात...
या सगळ्यातून थोडंफार काम होत राहतं आणि मग घरी जायची वेळ होते...
सांगायचं इतकंच कि करोनामुळे सध्या या गटाचे जामच वांदे झालेत. .
No comments:
Post a Comment