बिरबल जसा बुध्दिवान होता, तसाच तो रामभक्तही होता. अकबर जिथे जिथे जायचा बिरबल तिथे तिथे सोबत असायचा.
असेच एकदा सरकारी कामानिमित्त ते दोघे प्रवासाला निघाले होते. त्यांची वाट घनदाट अरण्यातून जात होती. प्रवासामुळे ते अगदी थकून गेले होते. अकबराला खूप भूक लागली, म्हणून तो जवळपास एखादी झोपडी दिसते का ते बघू लागला. बिरबलाही तो शोध घेण्यास सांगत होता, परंतु बिरबल रामनामाचा जप करण्यात मग्न होता.
बिरबलाकडे पाहून अकबर म्हणाला, नुसते नामजप केल्याने खायला अन्न मिळत नाही. त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाशिवाय काहीही मिळत नाही.
शेवटी अकबर त्याला तसेच ठेवून स्वतःच शोधायला निघाला. काही अंतरावर गेल्यावर अकबराला एक घर दिसले. अकबर त्या दिशेने चालू लागला.
आपला राजा आपल्या घराकडे येत असलेला पाहून त्या घरातील लोकांना आनंद झाला. त्यांनी राजाचे स्वागत केले. राजाला छान जेवायला दिले. अकबराने पोटभर जेवण करून बिरबलासाठीही अन्न सोबत बांधून घेतले व तो बिरबल बसला होता त्या झाडाजवळ आला व बिरबलला ते अन्न खायला देत म्हणाला, मी तुला म्हणालो होतो ना, बघ अन्न मिळविण्यासाठी मी थोडे प्रयत्न केले व मला अन्न मिळाले. तू फक्त रामनाम जपत बसलास, त्याने तुला अन्न मिळाले?
बिरबल म्हणाला, रामनामाचा महिमा मी यापूर्वी कधी अनुभवला नव्हता. तुम्ही या देशाचे शासक आहात. राजा असूनही तुम्हाला अन्नासाठी याचना करावी लागली आणि माझ्याकडे बघा, मी तर फक्त या झाडाखाली रामनाम जपत बसलो आणि या रामनामामुळे राजाला माझ्यासाठी अन्न घेऊन यावयास लावले. अशाप्रकारे मला इथे निवांत बसून रामनामाशिवाय दुसरे काहीही न करता जेवण करण्यास मिळाले.
हाच रामनामाचा महिमा आहे.
No comments:
Post a Comment