एकट्या जवाहरलाल नेहरूलाच बुद्धी दिली आहे असेही नाही. जवाहरलालपेक्षा बुद्धिमान अनेक आहेत. मी पाच वर्षे कॅबिनेटमध्ये होतो. पाच वर्षाचा मला अनुभव आहे. आठ दिवसातून एकवेळ मी काँग्रेसच्या बैठकीला हजर राहात असे. जवाहरलाल चांगले तोलून पाहिले आहेत. त्याचे डोके केवळ पोकळ भोपळ्याप्रमाणे आहे. त्यापलिकडे काही नाही. जवाहरलालचे नाक सरळ आहे. रंग गोरागोमटा आहे. म्हणून त्यास महत्त्व येत असेल तर गोष्ट वेगळी. पण अशी व्यक्ती शारदा नाटकात म्हटल्याप्रमाणे ' पाहिजे मुलीला सुंदर नवरा' या दृष्टीने उत्तम ठरेल. पण नेता बुद्धिमान पाहिजे, कणखर पाहिजे, तो देशाचे कार्य करणारा हवा असेल तर असे अनेक लोक सापडतील. पण तुम्हाला मात्र तोच पाहिजे ना ! विषयांतर झाले आणि काहींना ते अरुचकर वाटले तर त्यांनी क्षमा करावी. तुम्ही कदाचित मला मते देणार नाहीत. पण त्याची मला फिकीर नाही. मी चांगले ओळखतो की या देशाच्या जातीगत राजनीतीमध्ये आम्हाला कोणतेही स्थान नाही. राजकीय जीवन व्यतीत करता येत नाही, अशी स्थिती आहे. जीवनातील पाच वर्षे मी केंद्रिीय मंत्रीमंडळात काढली व दहा वर्षे केंद्रीय विधी मंत्रीमंडळात सदस्य म्हणून राहिलेलो आहे. आता मला पाहाण्यासारखे काही बाकी राहिले नाही. पूर्ण समाधान झाले आहे. राष्ट्राची हानी होऊ नये यासाठी हे सारे मी करतो. आज काँग्रेस सत्ताधारी आहे. ती तशीच पुढे सत्ताधारी राहिली तर या देशाला आग लागल्याशिवाय राहाणार नाही.
- बाबासाहेब आंबेडकर
प्रबुद्ध भारत-आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक
२७ ऑक्टोबर १९५६
No comments:
Post a Comment