Saturday, November 4, 2023

जगण्याची दृष्टी @

                  माझा एक मित्र एका नामांकित शिक्षण संस्थेत मुख्य व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. मागच्या आठवड्यात त्याच्या घरी गेलो होतो. त्याच्या घरातील एका टेबलावर काही पुस्तके दिसली. 

ती पाहून 'ही पुस्तके कोण वाचतेय,' असा प्रश्न मी त्याला विचारला.

'अरे, मीच वाचतोय,' असं त्यानं सांगितले.

 'कधीपासून वाचायला लागलास?

 पूर्वी तर कधी तुला वाचताना बघितलं नाही?' मी प्रश्नार्थक नजरेने त्याला विचारले.

'बरोबर आहे, तुझं म्हणणं. मला वाचनाची आवड नव्हतीच; पण मागच्या सहा महिन्यांपासून वाचायला सुरवात केलीय!' तो म्हणाला.

'अचानकच वाचायला कशी काय सुरवात

केलीस?' असं विचारताच तो सांगू लागला.

'मी संस्थेच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर माझा अनेक नवनवीन घटकांशी संबंध आला. अनेक कायदेशीर गोष्टींशी संबंध येऊ लागला. काही वेळा वेगवेगळ्या प्रकरणांत मला वादी, प्रतिवादी व्हावे लागत होते. न्यायालयीन प्रक्रिया, वादविवाद माझ्यासाठी नवीनच होते. जेव्हा मी आमच्या संस्थेच्या वकिलांना भेटत असे, तेव्हा या सगळ्याचा मला त्रास होतोय, हे त्यांच्या लक्षात यायचे. 

एकदा माझी ही अवस्था पाहून ते म्हणाले, 'तुम्ही वाचन करता का?'

 त्यांच्या प्रश्नावर मी नकारार्थी मान डोलावली. मी वाचन करत नाही, असं सांगितल्यावर त्यांनी मला वाचनाचा सल्ला दिला. वाचनाची सुरवात शिवाजी सावंत यांच्या 'मृत्युंजय' कादंबरीने करण्यास त्यांनी आवर्जून सांगितले.

'मृत्युंजय' कादंबरीनेच तुला वाचनाची सुरवात का करायला सांगितली?" 

मी विचारताच मित्र म्हणाला, की अरे मलासुद्धा हा प्रश्न पडला होता.

 तेव्हा ते म्हणाले "जीवनाकडे वेगवेगळ्या अंगाने कस पाहावे, जीवनाकडे तटस्थपणे कसं बघावं.

दुसऱ्याबद्दल आपण कसा विचार करावा, याची शिकवण या कादंबरीतील पात्रांमुळे होते. जीवन जगण्याचे गमक लक्षात आल्याने काही गोष्टींपासून होणारा त्रास सहन करण्याची मानसिक ताकद, बळ निर्माण होते. मित्राने मृत्युंजय कादंबरीबाबत असा खुलासा केल्यावर मी लगेचच त्याला विचारले यामुळे तू पुस्तके वाचायला सुरवात केलीस का? मृत्युंजय वाचलीस का?


हो, त्यांच्या सल्ल्यामुळे मी वाचनाला सुरवात केली आणि मृत्युंजय कादंबरी नवीन खरेदी करूनच वाचून काढली, त्यातील अनेक प्रसंग, छान छान  वाक्ये, वर्णने डायरीत लिहून ठेवली आहेत. असं सांगत त्याने मला डायरी दाखवली. 

ती पाहून मी विचारले, "अरे आता बरीच पुस्तके वाचताना दिसतोय. वाचनामुळे तुला तुझ्यात काय बदल जाणवतोय का ?"

त्यावर तो म्हणाला, "वाचनामुळे माझ्या विचारात, व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल झाला आहे. जीवन जगण्याची एक नवीन दृष्टी वाचनामुळे मिळाली आहे. वाचनामुळे झालेला बदल एखाद्या वस्तूप्रमाणे इतरांना दाखवता येत नाही, तो आपल्या वागण्या बोलण्यातून विचारांतून व्यक्त होत असतो. तो आपल्याला जाणवत असतो. मनाला त त्याची कल्पना येत असते. आपला आत्मविश्वास  वाढून आत्मविकास होण्यास मदत होते. "वाचनामुळे मित्रामध्ये झालेला बदल पाहून  आनंद झाला. 

सध्याच्या काळात वेगवेगळ्या माध्यमाद्वारा माहितीची कवाडे सर्वांसाठी खुली या झाली आहेत. तरीसुद्धा मानवी जीवनातील पुस्तकांचे  महत्त्व जरासुद्धा कमी झालेले नाही, पुस्तके ही माणसाचे खरे सोबती असतात. असं म्हटलं जातं. 

 पुस्तकांचे मानवी जीवनात किती मोठे महत्त्व आहे. क ते लोकमान्य टिळकांच्या विचारावरून अधोरेखित  होते. ते म्हणतात, 'स्वगपिक्षा चांगल्या पुस्तकांचे, मी अधिक स्वागत करीन; कारण पुस्तके जिथे  असतील, तिथे स्वर्ग निर्माण होतो. 

( पूर्व प्रसिध्दी दैनिक सकाळ)

★ संकलक ★

प्रा. माधव सावळे

No comments:

Post a Comment

जिन स्मरण

• णमोकार मन्त्र  https://youtu.be/fUntR5T4bJQ?feature=shared • भक्तामर स्तोत्रम् https://youtu.be/UPF4YwJKFIQ?si=9tlAC0T3fTx7H7uy • गणधर वलय...