"अहो, ऐकलंत का ?"
"काय झाले देवी ?"
"बघा ना, अहो आपल्या बाळाची तब्बेत बिघडली आहे. सगळे घरगुती उपचार केले पण काहीच फरक पडत नाही. कृपया, आपण आपल्या नेहमीच्या वैद्य ऋषींना पाचारण करता का ? पृथ्वीवरून परत आल्यापासून त्याला काय झालं आहे काहीच कळत नाही. माझ्या बाळाचे हाल मला बघवत नाहीत."
"पण देवी, बाळ गणेश जेव्हा पृथ्वीवरून आला तेव्हा ठीकच होता. म्हणजे आला त्या रात्री तिथल्या सगळ्या गमतीजमती कार्तिकेयला सांगत होता. मग अचानक असे काय झाले, की त्याची तब्बेत बिघडली ?"
"सांगते नंतर, आधी वैद्य ऋषींना बोलवा."
"ठिक आहे."
महादेवांच्या आदेशान्वये एक गण वैद्यऋषींना घेऊन आला. वैद्य बाल गणेशाची नाडीपरिक्षा करतात. पण त्यांना काय वाटले कोण जाणे. देवी पार्वतीकडे त्यांनी गणेशाच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली.
"मुनीवर, काय झालं आहे काहीच कळत नाही. बाळ गणेश नीट सांगतही नाहीत. फक्त खूप त्रास होत आहे, एवढंच म्हणतोय. कुठे बाहेर जात नाही, नीट भोजन करत नाही, मोदकांकडे तर बघितले देखील नाही. आपल्या कक्षातून बाहेरच पडत नाही. आपणच विचारणा करावी."
"ठिक आहे". (गणेशाकडे पाहून) "बाळ गणेश, काय होत आहे तुम्हाला ? काय त्रास होतोय ?"
"मुनीवर, काय सांगू मला काय काय होतंय ते ! माझे ना मस्तक खूपच दुखतंय. अंग पण दुखतंय. माझे पोट दुखतंय, बहुतेक बिघडले आहे. मला झोप येत नाही. सारखं दचकून उठतो मी. कुठेही जावे असे वाटतच नाही. मलाच माझ्या तब्बेतीचे टेन्शन आले आहे. कृपया, काहीतरी उपचार करावा मुनीवर."
"बापरे, म्हणजे एकंदर परिस्थिती गंभीर आहे."
महादेव आणि देवी पार्वती वैद्यऋषिंकडे पाहतात. देवी पार्वती तर घाबरून जाते.
"ऋषिवर काय झाले आहे माझ्या बाळाला ?"
"माते, आपण कष्टी होऊ नये, सगळ काही नीट होईल."
(गणेशाकडे वळून)
"बाळ गणेश, मला सांगा तुम्ही गेले दहा दिवस पृथ्वीवर तुमच्या भक्तांच्या भेटीसाठी गेला होतात, तिथे दहा दिवस आपण काय काय केले, ते जरा सांगता का ?"
"हो, सांगतो ना"
"आपण मला इति वृत्तांत द्यावा, म्हणजे आपले उपचार करता येतील."
"होय मुनीवर. आईच्या सगळ्या सूचना नीट लक्षात ठेवून मी पृथ्वीवर गेलो होतो. माझ्या भक्तांनी खूप भक्तिभावाने माझे स्वागत केले. घराघरांतून मी फिरत होतो. माझ्या भक्तांनी माझ्यासाठी खूप काही केले होते. सुंदर आरास, मोदक, लाडू, धूप दीप आणि सुग्रास जेवणाचा सुगंध येत होता. पण खरं सांगू का, गेल्या काही वर्षांपासून जेवणाची चव बदलल्यासारखी वाटतेय."
"का बर ? आपणच म्हणालात की सुग्रास जेवण होते."
"हो तर, पण म्हणजे कसं आहे ना, बऱ्याच घरातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, जुनी पिढी आता थकली आहे. त्यामुळे माझी सरबराई नव्या पिढीचे हाती. वाटलं होतं की, नाविन्यपूर्ण काही असेल, पण कितीतरी घरातून मला रेडिमेड मोदक खाऊ घातले. जेवण सुग्रास होते, पण त्यातील काही पदार्थ विकत घेतले होते त्यामुळे माऊलीचा मायेचा स्पर्श जाणवत नव्हता. पण माझ्या भक्तांनी प्रेमाने भारावलेला घास मी नाकारू शकत नव्हतो. जे जसे मिळाले तसे ग्रहण करावे लागले. पण त्यामुळे माझे पोट मात्र बिघडले आणि दुखू लागले. सार्वजनिक ठिकाणी तर मी भीतभीतच जात होतो. कारण तिथे मोठ्या आवाजात नुसत डिजे सुरू असायचा, ते मला अजिबात आवडत नाही. पण त्या लोकांना कळतही नाही ना. पण आता तर काही घरातून पण मोठ्यामोठ्याने गाणी लावली होती. ती ही चित्रपटातील. मला मुळीच आवडलं नाही. कुणी मला चक्रावर बसवलं, कुणी चंद्राच्या धारेवर, काहींनी एका पायावर उभं केलं, काहींनी तर मला दहा दिवस उभचं ठेवलं होतं हो. माझे अंग आणि पाय खूप दुखायला लागले आहे. उभ्या उभ्या जेवायला देखील होत नव्हत. अशाच परिस्थितीत कसेबसे दहा दिवस काढले. आणि परतीच्या प्रवासाला निघालो. पण खरं सांगतो, तो परतीचा प्रवास फारच अवघड होता. प्रिय भक्तांना सोडून माझाही पाय निघत नव्हता. जड अंतःकरणाने निघालो. कारण आई वडील वाट बघत होते ना. शिवाय कार्तिकेयचे पत्र आले होते, 'लवकर या' म्हणून. त्यामुळे निघालो. पण त्या परतीच्या प्रवासात अवस्था बिकट होती. साध्या टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली असती आणि निरोप दिला असता, तर मला जास्त आनंद झाला असता. पण हे लोक पण असे असतात ना .... कधी सुधारणार कोण जाणे. ते काय ते बेंजो की काय असतं, ते कर्णकर्कश्य आवाजात वाजवत होते. बरं त्यावर निरोपाची गाणी देखील नव्हती."
"मग ?" (सर्वांनी आश्चर्याने विचारले)
"छे छे, कस सांगू ... अतिशय विचित्र गाणी. आता मला निरोप देताना ते मच गया शोर, खलीबली, मेहबूबा, अरे दिवानो , कोंबडी पळाली, झिंगाट ही असली आणि काहीबाही विचित्र गाणी ... तुम्हाला सांगतो कानठळ्या बसवणारा आवाज होता. मी ओरडून सांगत होतो थांबायला, ते सगळ बंद करायला, पण सगळे नाचण्यात इतके दंग होते, की कुणाचे माझ्याकडे लक्षच नव्हते. जणू काही माझ्या जाण्याचा आनंद व्यक्त करत होते. त्या बेंजोच्या ओरडण्याने माझे कान दुखायला लागले आणि बंद झाले आहेत. कसाबसा इथे पोचलो. पण इथे आल्यावर आई, वडील, कार्तिकेय यांना पाहून खूप आनंद झाला. रात्रभर त्यांच्याशी बोलत होतो. झोप आली म्हणून झोपलो. पण झोपेतही त्या बेंजोचा थरकाप उडवणारा आवाज येतो, आणि मी दचकून जागा होतो."
"प्रभू, जर बाळ गणेशाला इतका त्रास होत असेल, तर पुढच्या वर्षी आपण त्याला पृथ्वीवर पाठवू नये."
"नाही नाही, असं करता येणार नाही. आई, अग १०० पैकी किमान २०-२५ घरे असतात जिथे मनापासून माझ्यासाठी सगळ करतात. त्यांच्यासाठी तरी मला जावे लागणारच."
"देवी, वर्षातून हे दहा दिवस बाळ गणेशाला पृथ्वीवर जावेच लागणार आहे. हा नियम तो कधीही मोडू शकत नाही. पृथ्वीवरील लोकांचा कितीही त्रास झाला, तरीही त्याला जावेच लागेल. आपण फक्त लोकांची मानसिकता बदलण्याची वाट बघायची."
"मुनीवर, कृपया आपण मला मी लवकर बरा होईन, असे औषध द्यावे. मला माझ्या लहान भावासोबत खेळायला जायचे आहे."
वैद्यऋषी गालातल्या गालात हसले. त्यांनी त्वरित एक मात्रा तयार करून तो द्रोण देवी पार्वतीच्या हाती दिला.
"माते, ही मात्रा रात्री झोपताना आपण बाळ गणेश यांना द्यावी. ही मात्रा घेतल्यानंतर तीन दिवस ते शांतपणे झोपतील, आणि मग अगदी ठणठणीत बरे होतील. मात्र, ते झोपल्यावर त्यांच्या कक्षात कोणताही आवाज होणार नाही, याची काळजी अवश्य घ्यावी."
सर्वांनी मुनीवरांचे आभार मानले आणि ते गेल्यानंतर पुन्हा सगळे गणेशाभोवती बसले ....
पृथ्वीवरच्या गोष्टी ऐकायला ....
© शिल्पा देवळेकर ......
No comments:
Post a Comment