परवा देशपांडे डॉक्टरांना देवाज्ञा झाल्याची बातमी वाचली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. देशपांडे डॉक्टर श्री वर्धन येथे पहिल्यांदा रहायला आले, तेव्हा ते प्रभू आळीच्या नाक्यावर रहात असत. त्या ठिकाणी ते आणि एक कस्टम अधिकारी (नाव आठवत नाही) त्यांच्यासोबत रूम घेऊन राहत असत. त्यांच्या पलीकडे रघुवीर लॉज हे कुलकर्णी यांचे लॉज होते. त्या लॉज चे मालक श्री कुलकर्णी एकदा आमच्याकडे आले आणि त्यांनी आईला देशपांडे डॉक्टरांकडे पोळ्या करून द्याल का, असे विचारले होते. माझी आई तेव्हा काही घरी पोळ्या करून द्यायला जात असे. कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून आईने देशपांडे डॉक्टर यांच्याकडे पोळ्या करून द्यायला सुरुवात केली. हा आमचा देशपांडे डॉक्टरांचा पहिला परिचय.
तेव्हा आजारी पडल्यावर लगेचच डॉक्टर कडे जायची प्रथा नव्हती. आधी घरगुती उपचार, त्यानंतर आमच्याच पाखाडीत असलेल्या वैद्यबुवांकडे काही काढा गोळ्या घ्यायला जायचे, तिथे जर फरक पडला नाही तर डॉक्टर वगैरेची गोष्ट केली जायची. माझ्या लहानपणी आम्ही फारसे डॉक्टरकडे गल्याचे मला आठवत नाही.
परंतु जेव्हा डॉक्टरांकडे जायची वेळ येईल तेव्हा आधी सरकारी दवाखाना हीच प्राथमिकता असायची. सुरुवातीला देशपांडे डॉक्टर सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत असत. त्यावेळेला बंधू केमनाईक यांचे वडील आप्पा केमनाईक तिथे जखमा बांधणे वगैरे काम करीत असत. चाफेकर कंपाऊंडर म्हणून काम करीत असत, पुढे त्यांनी RMP डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यानंतर देशपांडे डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यातली नोकरी सोडून आपला खाजगी दवाखाना सुरू केला.
सरकारी डॉक्टरची नोकरी सोडण्याचे त्यांचे एकमेव कारण होते, सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टम करणे आणि त्यानंतर कोर्टामध्ये साक्षी देण्यासाठी चकरा मारणे. यामध्ये डॉक्टरांचा वेळ निष्कारण वाया जातो, त्या मुदतीत अनेक रुग्णांना बरे करता येईल, उपचार देता येईल असे त्यांचे मत होते.
देशपांडे डॉक्टर यांनी आपला दवाखाना लायब्ररीच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये अनेक वर्ष चालवला. सुरुवातीच्या काळात त्यांची फी अगदी एक रुपयापासून असेल. त्या काळात इतर सर्व ठिकाणचे डॉक्टर आठ रुपयांपासून वीस रुपयापर्यंत फी घ्यायचे. परंतु देशपांडे डॉक्टरांनी कधीही आणि कितीही महागाई वाढली तरी आपल्या तपासणी फीची रक्कम अगदी कमीत कमी ठेवली. त्या काळामध्ये इंजेक्शन हा प्रकार नवीन होता आणि लोकांचा समज जो डॉक्टर इंजेक्शन देतो तो मोठा, असा होता. त्यामुळे त्याचा गुण पटकन येतो असा होता. परंतु देशपांडे डॉक्टरांनी कधीही आवश्यकता नसेल, तर इंजेक्शन दिले नाही. डॉक्टर इंजेक्शन द्या असे पेशंट त्यांना सांगायचे, परंतु त्यावर त्यांचे उत्तर ठरलेले असायचे, डॉक्टर मी आहे की तू आहेस? त्याचबरोबर त्यांनी कधीही अनावश्यक औषधे बाजारातून घेण्याकरता लिहून दिली नाही. ते लिहीत असलेले प्रिस्क्रीप्शन अगदी छापील अक्षर वाटावे अशा पद्धतीने लिहिलेले असायचे. अगदी इंग्रजीचे सुरुवातीचे धडे येणारा मुलगा सुद्धा ते वाचू शकत असे. सर्वसामान्यपणे डॉक्टरांचे अक्षर फक्त केमिस्ट किंवा त्यांचा कंपाऊंडरच वाचू शकतो, असे अनेक साहित्यिकांनी सुद्धा लिहून ठेवले आहे. परंतु देशपांडे डॉक्टर त्या गोष्टीला अतिशय दुर्मिळ असणारे अपवाद होते.
माझ्या आईला दम्याचा त्रास होता तेव्हा तिला तपासण्या करता बऱ्याच वेळा मी तिच्याबरोबर जात असे. अपवादात्मक प्रसंगी देशपांडे डॉक्टर घरी देखील आलेले आहेत. परंतु देशपांडे डॉक्टर घरी व्हिजिटला फारसे जायचे नाहीत.
देशपांडे डॉक्टरांनी श्रीवर्धन मध्ये जवळपास 40 वर्षे तरी आपली सेवा श्रीवर्धनकरांना दिली. त्या काळामध्ये त्यांनी कधीही स्वतःचे घर घेतले नाही, ते भाड्याने राहायचे. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नी शिवणकाम वगैरे करायच्या. मी पाहिलेल्या कुठल्याही डॉक्टरांचे रहाणीमान इतके सर्वसामान्य लोकांसारखे नव्हते. एखाद दुसरा अपवाद असेल त्यांच्याकडे सुरुवातीला स्कूटर होती. नंतर त्यांनी ती बंद करून सायकल वापरायला सुरुवात केली. त्यानंतर ते चालतच सगळीकडे जात असत. गाडी घोड्याशिवाय डॉक्टर ही संकल्पना त्यावेळी फारशी कोणाला माहित नव्हती.
माझ्या आईच्या आजारपणाची गोष्ट आहे, तिला दमा तर होताच, त्याशिवाय इतरही काही आजार होते. एकदा ती खूप आजारी पडली तेव्हा देशपांडे डॉक्टरांचे औषध चालू होते. परंतु इतर लोकांच्या सूचनांचा पाऊस पडत राहिल्यामुळे, तिचे मन बदलले आणि आम्ही डॉक्टर बदलायचे ठरवले. आम्ही तिला माझ्या बहिणीकडे नाशिकला घेऊन गेलो. तिथे आम्ही परदेशातून शिकून आलेले डॉक्टर होते, त्यांच्याकडे तिला घेऊन गेलो. आणि सांगायची विशेष गोष्ट अशी की, त्यांनी ज्या गोळ्या लिहून दिल्या तंतोतंत तशाच आणि त्याच गोळ्या देशपांडे डॉक्टरांनी लिहून दिल्या होत्या.
मी नोकरीत असताना त्यावेळी सहज रजा मिळत नसे, म्हणून वैद्यकीय दाखला देऊन रजेवर जायची पद्धत होती. या काळात अनेक डॉक्टर असे फिट आणि अनफिट दाखले देत असत. परंतु देशपांडे डॉक्टरांनी असा खोटा दाखला कधीही दिला नाही. मात्र खरोखरच आजारी असेल तर ते स्वतःहून असा दाखला द्यायचे आणि रजा घ्यायला सांगायचे.
श्रीवर्धन मध्ये जेव्हा ग्राहक पंचायतीची वितरण व्यवस्था सुरू झाली, त्यावेळी देशपांडे डॉक्टर वितरणाच्या कामात देखील सहभागी व्हायचे. श्रीवर्धनकरांच्या दृष्टीने ते देवच होते. त्यांच्या ऋणातून अंशतः उतराई व्हावे म्हणून, श्रीवर्धन मधील सर्व नागरिकांनी मिळून त्यांचा नागरी सत्कार केला होता. त्यावेळी सर्व समाजातील असंख्य नागरिक उपस्थित होते. असे दुर्मिळ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड निघून गेले आणि त्यांच्या आठवणी मात्र शिल्लक राहिल्या! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना!!💐💐💐
# अनिल वाकणकर, बडोदा. #
No comments:
Post a Comment