" सत्तावीस महीने आईच्या पोटात राहिल्यानंतर जन्म झालेला रेंदाळचा बाळू पुजारी.." 🙏🏻
(भाग १)
रेंदाळ गावचे धनगर समाजातील विठू पुजारी व त्याची पत्नी मायव्वा हे एक सांसारिक सुखी दाम्पत्य होते. विठू पुजारी याचे कुटूंब एकत्र पध्दतीचे होते. त्याला एक भाऊही होता. दोन्ही भावांपैकी एकजण घरची शेती करीत असे व दुसरा शंभर-सव्वाशे बकऱ्यांचा कळप सांभाळीत असे. एकंदरीत हे खाऊन पिऊन सुखी असणारे कुटुंब होते. परंतु या सुखी कुटूंबाला निसंतानतेच्या शापाने ग्रासले होते. त्यामुळे या कुटुंबात लहान मूल खेळताना दिसत नव्हते.
असेच बरेच दिवस गेल्यानंतर एकदाची आनंदाची बातमी पुजारी कुटुंबातून आली. विठूची पत्नी मायव्वा ही गरोदर होती. यामुळे पुजारी कुटुंबीय खूप आनंदी होते. परंतु कोणाची तरी दृष्ट लागली आणि हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. मायव्वाला गरोदर होऊन साडेनऊ महीने झाले तरी तीची प्रसूत होण्याची लक्षणे काही दिसून येत नव्हती. वैद्याच्या सल्ल्यानुसार इ.स. १९२६ सालातील जुलै महिन्याच्या १० ते १५ तारखेदरम्यान मायव्वाचे बाळंतपण व्हायला हवे होते. परंतु तसे काही झाले नाही आणि पुजारी कुटुंबियांसाठी ही एक काळजीची बाब बनली होती. सर्वसाधारणपणे नऊ - साडेनऊ महिन्यात कोणत्याही स्त्रीची प्रसुती होते, परंतु मायव्वाच्या बाबतीत सर्व विचित्रच घडत होते. गरोदरपणात अमावस्या व पौर्णिमेच्या वेळी मायाव्वाचे पोट भलतेच मोठे होई व इतर दिवशी ते सर्वसाधारण राही. पुजारी कुटुंबियांनी अनेक डाॅक्टर, वैद्य यांचे उपचार केले, देवर्षी व मांत्रिकांचेही मार्ग अवलंबले, परंतु मायाव्वाची प्रसुती काही झाली नाही. त्यामुळे पुजारी कुटुंबातील सर्वजण अतिशय चिंताग्रस्त झाले होते.
रेंदाळ गावातच पुजारी कुटुंबियाचा कोणी एक नातेवाईक राहत होता. तो देवावतारी बाळूमामांविषयी सर्व काही जाणत होता. त्याला पुजारी कुटुंबियांवर ओढवलेल्या संकटाविषयी माहीती होती. सहज म्हणून त्याने विठू पुजारीला मामांविषयी सांगितले. तो विठू पुजारीला पुढे म्हणाला, " आक्कोळचे धनगर संत बाळूमामाच आता काहीतरी उपाय करतील. त्यांच्या कृपेने मायाव्वाची सुटका होईल बघ. त्यासाठी आपण आदमापुर मुक्कामी त्यांना भेटाया जाऊया." हे त्याचे म्हणणे पुजारी कुटुंबातील सर्वांना पटले.
सर्वानुमते मामांकडे जाण्याचा दिवस निश्चित झाला. त्याप्रमाणे विठू पुजारी, त्याचे नातेवाईक व इतर मंडळी रेंदाळहून आदमापुरला मामांच्या दर्शनास निघाले. ते आदमापुरात मामांपाशी आले व सर्व हकिकत त्यांनी मामांना सांगितली. मामा त्या सर्वांना म्हणाले, " मायाव्वाची प्रसुती होईल, पण प्रसुती होईपर्यंत तुम्ही माझ्या बकऱ्याच्या तळावर सेवेत राहिलं पाहिजे." विठू पुजारी आणि सोबतच्या माणसांनी मामांचे म्हणणे एकदम मान्य केले. आपल्या गावास जाऊन तेथील शेती, बकरी व देण्याघेण्याचे व्यवहार यांची पूर्ण व्यवस्था लावण्यासाठी आठ दिवसाची सवड मात्र त्यांनी मामांकडून मागून घेतली. त्याबरोबरच गावाकडील व्यवस्था लावण्यासाठी ते सर्वजण रेंदाळला गेले.
गावात घरी गेल्यानंतर मामांनी सांगितलेला मार्ग विठू पुजारीने त्याच्या भावाला सांगितला. विठूच्या भावानेही मामांचा मार्ग अवलंबण्यास तात्काळ होकार दिला. तो विठूला म्हणाला, " दादा ! आईप्रमाणे आमच्यावर माया असणाऱ्या वहिनीच्या जीवापेक्षा हा प्रपंच काय मोठा आहे ? आपण सगळेजण मामांच्या जवळ राहायला जाऊया. तोपर्यंत आपली बकरी पाहूण्यांकडे सांभाळण्यास ठेऊ आणि शेत दुसर्या कोण्या शेतकर्याला वाट्याने कसायला देऊ. तसंच आई - वडिलांना पोटापाण्याची व्यवस्था करून ईथंच ठेवू. आपण दोघेजण मात्र सहकुटुंब बाळूमामांकडं सेवेला जाऊ. शेवटी काहीतरी चांगलंच होईल बघ."
No comments:
Post a Comment