🙏🏻 " निर्दयी मोटार ड्रायव्हरला मामांनी अद्दल घडवली.."🙏🏻
(भाग १)
स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात बहूधा सर्वत्र प्रवाशांची वाहतूक खाजगी मोटारवालेच करत असत. कोल्हापूर-निपाणी, बेळगाव-बेंगलोर या महामार्गावर पुरेशा खाजगी मोटारी धावत असायच्या. परंतु निपाणीभोवतालच्या ग्रामीण परिसरातील भागात प्रवासी माणसांची वाहतूक करणाऱ्या मोटारी फार कमी होत्या. यामुळे तेथील गरीब जनतेला याचे व्हायचे तेच दुष्परिणाम भोगावे लागत होते.
इ.स. १९४१ सालातील ही घटना आहे. भरउन्हाळ्यातील दुपारची वेळ होती. एक गरीब म्हातारी राधानगरी - निपाणी रस्त्याने निपाणीला निघाली होती. निपाणीपासून पश्चिमेस १० किमी अंतरावर बस्तवडे या गावाला उत्तरेकडे जाणारा फाटा आहे. त्या ठिकाणी हमिदवाडा गावातील प्रवासीही मोटारीसाठी थांबतात. चालून फार थकल्यामुळे म्हातारी बस्तवडे थांब्यावर थांबली होती. ती एखाद्या मोटारीची वाट पहात एका झाडाच्या सावलीत बसली होती. बऱ्याच वेळानंतर एक खासगी मोटार तेथे आली. ती मोटार निपाणीला प्रवासी घेऊन चालली होती. म्हातारीला पाहून त्या मोटारीच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली. म्हातारी गाडीत बसल्यावर गाडी निघाली. ड्रायव्हरने प्रवासभाडे मागितल्यावर म्हातारीने तिच्याजवळचे होते नव्हते ते चार आणे काढून त्याला दिले. तथापि ते ठरलेल्या प्रवास भाड्याहून कमी होते. त्यामुळे ड्रायव्हर बाकीचे पैसे मागू लागला. यावर म्हातारी म्हणाली, " माझ्याजवळ फक्त एवढेच पैसे आहेत. मला अजीबात चालणं होत नाही. म्हातारपणाने अंगात जराबी बळ उरलं नाही. मेहरबानी कर आणि मला गरीबाला एवढं निपाणी पर्यंत घेऊन चल." केवळ पैशाचा लोभ असणाऱ्या त्या निर्दयी मोटार ड्रायव्हरला म्हातारीची मुळीच दया आली नाही. त्याने म्हातारीशी वाद घातला. याबरोबरच त्या ड्रायव्हरने म्हातारीला भर रस्त्यावर गाडीतून खाली उतरवले आणि मोटार निपाणीच्या दिशेने वेगात धावू लागली.
ड्रायव्हरच्या निर्दयी वागणूकीमुळे असाहाय्य अवस्थेत म्हातारी भर उन्हात कपाळाला हात लावून आपल्या दैवाला दोष देत रस्त्याकडेला थांबली. थोड्याच वेळात एका धनगराचा मेंढ्यांचा कळप त्याच रस्त्याने पूर्व दिशेकडे चालला होता. पुढे वाट दाखविणारा गडी त्याच्यामागून झपाझप चालणारी बकरी, इकडेतिकडे स्वैरपणे बकरी जाऊ नयेत म्हणून हाकारणारे गडी, कळपामागून घोडे, त्यामागून काही गडीमाणसे असा नेहमीचा तो थाट चालला होता. कळप थोडा पुढे गेल्यानंतर कळपामागून जाणारा धनगर मालक पांढरेशुभ्र धोतर नेसलेला, लांबबाह्यांचा शर्ट घातलेला, पायात चपला, डोक्यावर जरीचा फेटा बांधलेला आणि खांद्यावर घोंगडे टाकलेला अशा रूबाबात येत होता. ह्या धनगराने रणरणत्या उन्हात कपाळाचा घाम पुसत बसलेल्या म्हातारीला पाहिले व तो तिच्याकडे आला. त्या भारदस्त दिसणाऱ्या धनगराने तिची विचारपूस केली. भोळ्याभाबड्या म्हातारीने जे घडले ते सर्व त्या धनगराला सांगितले. पुढे म्हातारी धनगराला म्हणाली, " आता मी कशी जायची निपाणीपर्यंत ?" हे तिचे अखेरचे शब्द ऐकून धनगराने मनोमनी काय विचार केला कोण जाणे? परंतु तो काहीही न बोलता त्याच्या कळपामागे पुढे निघून गेला.
क्रमशः
🙏🏻 ' बोलाss, बोलाss बाळूमामांच्या नावाने चांगभलं..' 🙏🏻
No comments:
Post a Comment